रांजणगाव शिवारात 42 वीज खांबांवरील 7.5 किमी लांबीच्या तारांची चोरी; महावितरणचे लाखो रुपयांचे नुकसान
- gramasthlive
- Dec 10, 2025
- 2 min read
चाळीसगाव: दि. ०८/१२/२०२५ रोजी चाळीसगाव तालुक्यात रांजणगाव आणि पिंपरखेड शिवारात अज्ञात चोरट्यांनी ४२ (बेचाळीस) वीज खांबांवर चढून सुमारे ७.५० किलोमीटर लांबीच्या उच्च दाबाच्या अॅल्युमिनियमच्या (AAAC 55 Sq mm) तारा चोरून नेल्याची गंभीर घटना घडली आहे. या चोरीमुळे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (महावितरण) चे अंदाजे रु. २,३५,४१८/- (अक्षरी रुपये दोन लाख पस्तीस हजार चारशे अठरा मात्र) चे मोठे नुकसान झाले असून वीजपुरवठा खंडित झाल्याने शेतकऱ्यांची मोठी गैरसोय झाली आहे.
प्रधान तंत्रज्ञ गजानन संतोष साबळे (वय ४४, नेमणूक: महावितरण, चाळीसगाव ग्रामीण कक्ष-२, मो. ९४२१४०५०७०, रा. कैवल्य नगर, चाळीसगाव) यांनी स्वतः पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित राहून अज्ञात चोरट्यांविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार, दिनांक ०८/१२/२०२५ रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास त्यांचे अधिकारी, सहाय्यक अभियंता विशाल सोनवणे यांनी त्यांना फोन करून रांजणगाव शिवारातील वीज तारा चोरीला गेल्याची माहिती दिली. यानुसार साबळे यांनी तातडीने सहकारी वरिष्ठ तंत्रज्ञ भूषण नाना पाटील (मो. ९२८४०४११३१) यांना कळवून घटनास्थळी धाव घेतली.
दुपारी १.०० वाजता रांजणगाव शिवारात पोहोचल्यावर त्यांना सहकारी भूषण नाना पाटील, कंत्राटी कामगार विकास गांगुर्डे, पृथ्वी जाधव आणि स्थानिक शेतकरी उपस्थित आढळले. शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक ०७/१२/२०२५ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत तारा शेतात होत्या. त्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांनी मिळून पाहणी केली असता, चोरी झाल्याची खात्री झाली. बापू गिरधर चौधरी यांचे शेत गट नं. ४८/०१ जवळील बांधावरील इलेक्ट्रिक पोलपासून ते पिंपरखेड शिवारातील मनीषा अण्णा बोराडे यांचे शेत गट नं. ३४१ पर्यंतचे २९ पोल आणि रांजणगाव शिवारातील बापू गिरधर चौधरी यांचे शेत गट नं. ४८/०१ समोरील कच्च्या रस्त्यापलीकडील पोलपासून ते सुरेश पुंडलिक सूर्यवंशी यांचे शेत गट नं. १४१/०२ पर्यंतचे पोल मिळून एकूण ४२ वीज खांबांवरील अॅल्युमिनियमच्या AAAC 55 Sq mm उच्च दाबाच्या तारा तोडून चोरट्यांनी लंपास केल्याचे निष्पन्न झाले आहे.
ही चोरी दिनांक ०७/१२/२०२५ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपासून ते दिनांक ०८/१२/२०२५ रोजी दुपारी १२.३० वाजेच्या दरम्यान झाली असल्याचा अंदाज आहे. अज्ञात चोरट्यांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या संमतीशिवाय, लबाडीच्या उद्देशाने पोलवर चढून हा प्रकार केला आहे. साबळे यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार आज (दि. १०/१२/२०२५) रोजी पोलीस स्टेशनमध्ये हजर राहून अज्ञात चोरट्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे चाळीसगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.
ग्रामस्थ लाईव्ह संपादक
किसनराव जोर्वेकर
बातमीसाठी संपर्क:
बबलू अहिरे, चाळीसगाव




Comments