top of page
Search

चाळीसगाव : शहर विकास आघाडीच्या गटनेतेपदी दीपक पाटील यांची निवड, राजकीय समीकरणे बदलली

  • Writer: gramasthlive
    gramasthlive
  • Dec 27, 2025
  • 1 min read



चाळीसगाव (प्रतिनिधी) : चाळीसगाव नगरपालिकेत राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला असून भाजपच्या निवडीला प्रत्युत्तर म्हणून आता शहर विकास आघाडीने देखील आपल्या गटनेत्याची अधिकृत घोषणा केली आहे. शहर विकास आघाडीच्या गटनेतेपदी नगरसेवक दीपक उत्तमराव पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली असून या निवडीमुळे स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. दीपक पाटील हे सलग तिसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आलेले अनुभवी लोकप्रतिनिधी असून ते माजी आमदार राजीव देशमुख यांचे अत्यंत खंदे समर्थक मानले जातात. ही महत्त्वाची निवड माजी आमदार राजीव देशमुख यांच्या ‘राजगड’ या निवासस्थानी पार पडलेल्या विशेष बैठकीत घेण्यात आली. या निवडीच्या प्रक्रियेत शहर विकास आघाडीचे निवडून आलेले नगरसेवक राहुल म्हस्के, नगरसेवक दीपक पाटील, नगरसेवक ईम्रान शेख, नगरसेविका वैशाली मोरे, नगरसेविका स्वाती राखुंडे, नगरसेविका विजया पवार, नगरसेविका पूनम आहिरे, नगरसेविका सायली जाधव, नगरसेविका राजश्री राजपूत आणि नगरसेविका सविता ठाकूर हे सहभागी झाले होते. या निवडीसोबतच पालिकेतील संख्याबळाचे नवे समीकरण समोर आले असून शहर विकास आघाडीची ताकद आता वाढली आहे. आघाडीचे स्वतःचे १० मूळ नगरसेवक असून त्यांना भाजपमधील दोन बंडखोर अपक्ष नगरसेवक राजेंद्र चौधरी व सायली जाधव यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. यामुळे आघाडीचे एकूण संख्याबळ १२ झाले असून, दोन अपक्ष नगरसेवकांनी साथ दिल्याने आघाडीचे पारडे जड झाले आहे. या निवडीची अधिकृत नोंदणी करण्यासाठी सर्व नगरसेवक आणि नगरसेविका जिल्हाधिकाऱ्यांकडे रवाना झाले आहेत. दीपक पाटील यांचा दांडगा अनुभव आणि वाढलेल्या संख्याबळामुळे आगामी काळात शहर विकास आघाडी पालिकेत अधिक आक्रमक भूमिकेत पाहायला मिळणार असून सत्ता संघर्षाचा पेच अधिक रंजक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ग्रामस्थ लाईव्ह संपादक किसनराव जोर्वेकर बातमीसाठी संपर्क बबलु आहिरे चाळीसगाव

 
 
 

Comments


bottom of page