चाळीसगाव बसस्थानक परिसरातील वादातून तरुणाचा खून; तिघांना पोलीस कोठडी!
- gramasthlive
- 32 minutes ago
- 2 min read
चाळीसगाव बसस्थानक परिसरातील वादातून तरुणाचा खून; तिघांना पोलीस कोठडी!
चाळीसगाव: येथील बसस्थानकाच्या पाठीमागे दुकान लावण्याच्या कारणावरून झालेल्या जुन्या वादातून एका २५ वर्षीय तरुणाचा वीट व दगड डोक्यात मारून निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अक्षय भानुदास पाटील (रा. लक्ष्मीनगर, चाळीसगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसांनी मुख्य आरोपीसह त्याच्या दोन साथीदारांना अवघ्या काही तासांत अटक केली असून न्यायालयाने आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मृत अक्षय पाटील आणि मुख्य आरोपी निखिल उर्फ भोला अजबे यांच्यात बसस्थानकाच्या पाठीमागे दुकान लावण्याच्या कारणावरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. दिनांक १८ जून २०२६ रोजी रात्री ८:३० वाजेच्या सुमारास आरोपी निखिल याने अक्षय याला बसस्थानकाच्या मागे असलेल्या मांगरवाडी भागात बोलवून घेतले. तिथे त्यांच्यात पुन्हा याच कारणावरून जोरदार वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर निखिल याने तिथे असलेल्या विटा व दगडाने अक्षयच्या डोक्यावर गंभीर वार केले आणि तो घटनास्थळावरून पळून गेला.
घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे कर्मचारी आशुतोष सोनवणे, अशोक पाटील, समाधान पाटील, निलेश पाटील व दत्तू सावळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी गंभीर जखमी असलेल्या अक्षयला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, चाळीसगाव येथे दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी मृत अक्षयचे वडील भानुदास राजाराम पाटील (वय ७५, रा. लक्ष्मीनगर, चाळीसगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गु.र.नं. २९६/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ कलम १०३(१) प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस पथकाकडून आरोपींना अटक
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांनी आरोपीच्या शोधासाठी पोउपनि संदीप घुले, पोहेकॉ योगेश बेलदार व पोकॉ निलेश पाटील यांचे तपास पथक तयार केले.
तपास पथक आरोपीच्या शोधात असताना, आरोपी निखिल उर्फ भोला अजबे हा कन्नड घाटातून चाळीसगावकडे येत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तात्काळ सापळा रचून निखिल याला ताब्यात घेतले. तसेच त्याच्यासोबत असलेल्या प्रेम रविंद्र कसबे (रा. नारायण वाडी, चाळीसगाव) व कन्हैया जितेंद्र देठे (रा. इंदिरा नगर, चाळीसगाव) यांनाही ताब्यात घेण्यात आले. पोलीस ठाण्यात आणून अधिक चौकशी केली असता, या खुनाच्या गुन्ह्यात या दोन्ही साथीदारांचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना पोलीस कस्टडी रिमांड सुनावली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि संदीप घुले करत आहेत.
ग्रामस्थ लाईव्ह संपादक: किसनराव जोर्वेकर बातमीसाठी संपर्क: बबलु आहिरे, चाळीसगाव





Comments