चाळीसगाव: जामदा धरणातून वाळू उपसा आणि तस्करीचा गंभीर प्रकार; महसूल पथकांवर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप
- gramasthlive
- 2 days ago
- 2 min read
जामदा (चाळीसगाव): चाळीसगाव जवळील जामदा धरणातून दररोज रात्री १० ते पहाटे ५ वाजेपर्यंत यंत्रांच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा (Sand Mining) सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, गौण खनिज चोरी रोखण्यासाठी नियुक्त केलेल्या महसूल पथकांचे अधिकारी व कर्मचारीच या वाळू चोरांना अभय देत असून, त्यांच्यावर 'अर्थपूर्ण' व्यवहार केल्याचा थेट आरोप होत आहे.वाळू तस्करीची पद्धत आणि प्रमाण
वेळ आणि उपकरण: दररोज रात्री १० ते पहाटे ५ वाजेपर्यंत या धरणातून यंत्रांच्या (मशिनरी) सहाय्याने वाळू उपसा केला जातो.
प्रमाण: दररोज तब्बल ३०० ते ४०० ब्रास वाळूचा उपसा होत असल्याचा अंदाज आहे.
वाहतूक: उपसा केलेली वाळू पहाटेनंतर डंपर व ट्रॅक्टरद्वारे भरून चाळीसगाव, नाशिक आणि संभाजीनगर (औरंगाबाद) यांसारख्या मोठ्या शहरांकडे पाठविली जाते.
साठा: अवैध मार्गाने उपसलेल्या वाळूचा साठा आनंदा धर्मा महाले आणि भानुदास दाजिबा जाधव यांच्या मालकीच्या शेल येथील गट नं. १४३/२ व १४२/२अ मध्ये केला जातो.प्रशासकीय यंत्रणेवर गंभीर आरोप
या भागातील वाळू चोरी आणि तस्करीशी संबंधित व्यक्तींची नावे स्थानिक प्रशासनाला ज्ञात असतानाही कारवाई होत नाही. महसूल कर्मचारी आणि मेहुणबारे पोलीस स्टेशनला या गैरप्रकाराची संपूर्ण माहिती आहे. तरीही पथक गौण खनिज चोरीला प्रतिबंध करत नाहीत. यामागे वाळू चोरांकडून महसूल कर्मचाऱ्यांना मोठ्या रक्कमेचे 'हप्ते' मिळत असल्याची चर्चा आहे.जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली जिल्हाधिकारी, जळगाव यांच्या आदेशानुसार गौण खनिजाची चोरी रोखण्यासाठी चाळीसगाव येथे मंडळ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली १० पथके नेमण्यात आली आहेत. प्रत्येक पथकात ५ ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांचा समावेश आहे. यातील काही पथके प्रामाणिकपणे काम करत असली तरी, बहुतांश पथक रात्रीच्या वेळी कारवाईसाठी बाहेर पडत नाहीत. या निष्क्रियतेमागेही आर्थिक कारणे असल्याचे स्पष्टपणे बोलले जात आहे.पथक प्रमुखच कर्तव्यच्यूत
शुक्रवारी रात्री दहा वाजेनंतर जामदा धरणातून उपसा झालेली वाळू घेऊन जवळपास ७ ट्रॅक्टर आणि ४ डंपर वाहतुकीसाठी निघाले होते. या गैरप्रकाराची माहिती देण्यासाठी वाळू चोरी प्रतिबंधक पथकाचे प्रमुख आणि तळेगाव विभागाचे मंडळ अधिकारी ज्ञानेश्वर माळी (भ्रमणध्वनी क्र. ९९२३१५३६८७) यांना फोन केला असता, त्यांनी फोन उचलला नाही. अधिक चौकशीअंती माळी यांच्या नेतृत्वाखालील पथक कर्तव्यावर गेलेच नव्हते, अशी माहिती मिळाली. "येथे कुंपणच शेत खात आहे" अशा शब्दांत प्रामाणिक अधिकाऱ्यांनी आपली खंत व्यक्त केली.जिल्हाधिकाऱ्यांकडे पुरावे सादर
जामदा धरणातून रात्रीच्या वेळी यंत्राच्या सहाय्याने वाळू उपसा कसा केला जातो, याचा सविस्तर व्हिडिओ पुरावा म्हणून जिल्हाधिकारी (जळगाव), जिल्हा पोलीस प्रमुख (जळगाव) यांच्यासह चाळीसगावचे प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्याकडे पाठवण्यात आला आहे. या तक्रारीत वाळू तस्करांची नावे देखील प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आली आहेत.तहसीलदार साहेबांनी नियुक्त केलेल्या या पथकांनी प्रामाणिकपणे काम करून गौण खनिज चोरी थांबवावी, अशी अपेक्षा असताना, पथक प्रमुखांच्या आर्थिक गैरव्यवहारामुळे शासनाच्या उद्देशालाच हरताळ फासला जात आहे.
ग्रामस्थ लाईव्ह
संपादक: किसनराव जोर्वेकर
बातमीसाठी संपर्क: महेंद्र सूर्यवंशी व बबलू अहिरे, चाळीसगाव





Comments