चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनची मोठी कारवाई: महामार्गावर लुटमार करणाऱ्या आरोपींना अटक!
- gramasthlive
- Dec 4, 2025
- 2 min read
चाळीसगाव (प्रतिनिधी) -
धुळे-सोलापूर महामार्गावर हतनूर (ता. कन्नड) हून चाळीसगावच्या दिशेने येत असलेल्या एका प्रवाशाला चाकूने जखमी करून लुटल्याप्रकरणी, चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी तत्काळ आणि प्रभावी कारवाई करत, कोणताही ठोस दुवा नसताना तीन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून जबरीने हिसकावलेली रोकड, मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली रिक्षा व चाकू जप्त करण्यात आला आहे.घटनेचा तपशील:दिनांक २८/११/२०२५ रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास फिर्यादी मंगेश बंडू आल्हाट (वय-२२ वर्ष, रा. हतनूर) हे त्यांचे दोन साक्षीदार मित्रांसह मोटारसायकलने हतनूर येथून चाळीसगाव कडे येत असताना, धुळे-सोलापूर हायवेच्या कडेला लघुशंकेसाठी थांबले होते. याच वेळी त्यांच्या मोटारसायकलजवळ एक रिक्षा थांबली आणि त्यातून तीन अनोळखी तरुण उतरले.
त्यापैकी एका आरोपीच्या हातात चाकू होता. त्यांनी फिर्यादी आणि त्यांच्या साक्षीदारांना, "तुम्ही एवढ्या रात्री इथे काय करत आहात?" असे बोलून त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी अचानक केलेल्या हल्ल्यामुळे साक्षीदार विशाल केवट हे घाबरून घटनास्थळावरून पळून गेले.चाकूचा हल्ला आणि लूट:हल्ला करणाऱ्या एका आरोपीने फिर्यादी मंगेश आल्हाट यांच्या डाव्या हातावर चाकूने वार केला आणि त्यांच्या खिशातील ₹ ६,४००/- रोख रक्कम जबरीने काढून घेतली. याच वेळी इतर दोन आरोपींनी दुसरे साक्षीदार निवृत्ती भडंग यांना लाथा-बुक्यांनी मारहाण करून त्यांचा इंफीनिक्स कंपनीचा मोबाईल फोन बळजबरीने हिसकावून घेतला. त्यानंतर तिन्ही आरोपी रिक्षातून पळून गेले.गुन्हा दाखल आणि पोलिसांची तत्काळ हालचाल:घटनेनंतर फिर्यादी मंगेश आल्हाट यांनी दिलेल्या माहितीनुसार, चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गु.र.नं ३७३/२०२५ BNS २०२३ चे कलम ३०९(४), ३०९ (६) व ३११ प्रमाणे जबरी चोरी आणि हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन, चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी तातडीने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना माहिती दिली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथके तात्काळ घटनास्थळी व तपासासाठी रवाना झाली.आरोपींना शिताफीने अटक:सहा. पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, पो.उप नि. प्रदिप शेवाळे, स.फौ. युवराज नाईक, पोहवा संदीप माने, पोशि विजय पाटील, पोहवा विकास चव्हाण यांच्यासह स्थागुशा जळगाव येथील पथकाने अत्यंत प्रभावी आणि गोपनीयता ठेवून तपास सुरू केला.कोणताही ठोस दुवा (Clue) नसताना, केवळ गोपनीय बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणाच्या (Technical Analysis) आधारे पोलिसांनी गुन्ह्यातील संशयित आरोपी ऋषिकेश कासार यास त्याच्या रिक्षासह शिताफीने ताब्यात घेतले.गुन्ह्याची कबुली आणि मुद्देमाल जप्त:आरोपी ऋषिकेश कासार याच्याकडे कसून चौकशी केली असता, त्याने सदर गुन्हा त्याचे साथीदार गणेश महेंद्र पवार आणि रमेश उर्फ वाल्मिक सोमनाथ सुपलेकर (रा. चामुंदा माता मंदीरा जवळ, जय बाबजी चौक, ता. चाळीसगाव) यांच्या मदतीने केल्याची कबुली दिली. पोलिसांनी तातडीने तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून, गुन्ह्यात वापरलेली रिक्षा जप्त करण्यात आली आहे.
तपासिक अधिकारी यांनी आरोपींकडून फिर्यादीकडील हिसकावलेल्या रकमेपैकी ₹ ४,१००/- रोख रक्कम, साक्षीदाराकडील मोबाईल फोन आणि गुन्ह्यात वापरलेला चाकू जप्त केला आहे.या यशस्वी कारवाईमुळे महामार्गावरील प्रवाशांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दल समाधान व्यक्त होत आहे. पुढील तपास:
सदर गुन्ह्याचा पुढील तपास मा. पोलीस अधिक्षक श्री. महेश्वर रेड्डी, मा. अपर पोलीस अधिक्षक श्रीमती कविता नेरकर, मा. उप विभागिय पोलीस अधिकारी श्री. विजयकुमार ठाकुरवाड तसेच मा. सहा. पोलीस नितीन पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पो.उप नि. प्रदिप शेवाळे हे करीत आहेत.
ग्रामस्थ लाईव्ह
संपादक: किसनराव जोर्वेकर
बातमीसाठी संपर्क: बबलू आहिरे, चाळीसगाव




Comments