चाळीसगाव ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई! दुचाकी चोरीच्या तपासात उघडकीस आले 11 पाणबुडी मोटारींचे मोठे रॅकेट; 3 आरोपी अटकेत, ₹1.24 लाखांचा मुद्देमाल जप्त
- gramasthlive
- Oct 10
- 2 min read
वृत्तसंस्था:-चाळीसगाव (जळगाव): चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनने एका दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना मोठी कामगिरी बजावली असून, तब्बल 11 पाणबुडी इलेक्ट्रिक मोटारींच्या चोरीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून, एकूण ₹1 लाख 24 हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुर नं 308/2025 BNS कलम 303(2) नुसार दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यातील अज्ञात आरोपींचा शोध घेत असताना, मिळालेल्या बातमीवरून पोलिसांनी तात्काळ हालचाल करत तीन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांची नावे अशी: सोमनाथ रघुनाथ निकम (वय २८, रा. अंधारी, ता. चाळीसगाव), सुधीर नाना निकम (वय २९, रा. महारवाडी ता. चाळीसगाव ह. रा. आनंदवाडी, नांदगाव, जि. नाशिक), आणि सम्राट रवींद्र बागुल (वय २६, रा. महारवाडी, ता. चाळीसगाव).
ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे कसून चौकशी केली असता, त्यांनी सदर दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. त्यांनी चोरी केलेली ₹30,000/- किमतीची मोटरसायकल हातगाव, ता. चाळीसगाव येथून काढून देण्यात आली.
या आरोपींना विश्वासात घेऊन पोलिसांनी अधिक तपास केला असता, त्यांनी मागील एक ते दीड वर्षापासून अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पाणबुडी इलेक्ट्रिक मोटारी चोरल्याचे धक्कादायक सत्य उघडकीस आले. या मोटारी चोरून, त्या स्वतःच्या असल्याचे सांगत त्यांनी अंधारी गावातील शेतकऱ्यांना विकल्या होत्या. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत चोरीस गेलेल्या एकूण 11 पाणबुडी इलेक्ट्रिक मोटारी हस्तगत केल्या. या मोटारींची किंमत ₹94,000/- आहे.
या यशस्वी कारवाईमुळे दुचाकी चोरीचा गुर नं 308/2025 आणि पाणबुडी मोटार चोरीचा गुर नं 127/2025 असे एकूण दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. जप्त मुद्देमालामध्ये एक मोटरसायकल (₹30,000/-) आणि 11 पाणबुडी मोटारी (₹94,000/-) यांचा समावेश आहे, ज्याची एकूण किंमत ₹1,24,000/- आहे. तिन्ही आरोपींची वैद्यकीय तपासणी करून पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी त्यांना चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.ही कौतुकास्पद कारवाई Psi शेखर डोमाळे, Pc महेश पाटील, Pc सागर पाटील, Pc भूषण शेलार, आणि चापोकॉ/बाबासाहेब पाटील यांच्या पथकाने पार पाडली आहे.





Comments