चाळीसगांवी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र निषेध
- gramasthlive
- Oct 8
- 2 min read
वृत्तसंस्था:- चाळीसगांव, महाराष्ट्र:
भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर वकील राकेश किशोर या व्यक्तीने न्यायालयात केलेल्या बुट हल्ल्याचा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने चाळीसगांव येथे तीव्र निषेध करण्यात आला. या भ्याड हल्ल्याबद्दल राकेश किशोर यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी तहसिलदार प्रशांत पाटील यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.निषेध आणि मागणीची भूमिका
हा हल्ला म्हणजे केवळ एका व्यक्तीवर केलेला हल्ला नसून, न्यायसंस्थेच्या प्रमुखावर मनुवादी विचारांची दहशत निर्माण करण्याचा आणि लोकशाही व संविधानावर थेट हल्ला असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष किसनराव जोर्वेकर यांनी केला आहे.या हल्ल्यामागे इतरही कारणे असू शकतात, असा संशय व्यक्त करताना श्री. जोर्वेकर म्हणाले की, गवई यांच्या मातोश्रींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) नागपूर येथील कार्यक्रमाला उपस्थिती लावली नाही, या रागातूनही हा हल्ला करण्यात आला असावा.
निवेदनावर स्वाक्षरी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती तहसिलदारांना निवेदन सादर करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ आणि तरुण पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये जिल्हा उपाध्यक्ष किसनराव जोर्वेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, प्रदेश संघटक शशिभाऊ साळुंखे, सामाजिक न्याय विभागाचे जळगांव जिल्हाध्यक्ष सुरेश पगारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, शहराध्यक्ष शाम देशमुख, तसेच अॅड. आकाश पोळ यांचा समावेश होता.
निवेदनावर स्वाक्षरी करणाऱ्यांमध्ये भाऊसाहेब पोळ, पितांबर झाल्टे, देविदास जाट, प्रभाकर पारवे, गौतम जाधव, बबलु जाधव, बबलु अहिरे, देविदास भिमराव मोरे, सागर निकम, माजी पं. स. सदस्य बाजीराव दौंड, अनिल महिंदळे, किरण सदाशिव महाले, साहिल अनिल आव्हाड, सुभाष हिलाल पाटील, प्रकाश भिमजी निकम यांच्यासह सामाजिक न्याय विभागाच्या अनेक कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.
देशभरातून संतापाची लाट
सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात न्यायदानाच्या कामादरम्यान सरन्यायाधीशांवर हल्ला करण्याचा हा प्रयत्न अतिशय लज्जास्पद आणि घृणास्पद कृत्य आहे. या घटनेचा निषेध देशभरातील राजकीय पक्षांचे नेते, कायदेतज्ज्ञ आणि विविध स्तरातील नागरिकांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही या घटनेचा तीव्र निषेध केला असून, "भारतीय लोकशाहीचे स्तंभ कमकुवत होणार नाहीत," यासाठी कायम प्रयत्नशील राहण्याची ग्वाही दिली आहे. हल्ला करणारा वकील राकेश किशोर याने 'सनातनचा अपमान सहन करणार नाही' अशा घोषणा दिल्या होत्या. बार कौन्सिल ऑफ इंडियाने राकेश किशोर यांना तात्काळ निलंबित केले असून शिस्तभंगाची कारवाई सुरू केली आहे.





Comments