अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या तालुक्यांच्या यादीत चाळीसगांव तालुक्याचा समावेश करण्याची रा. कॉ.ची मागणी अखेर पूर्ण
- gramasthlive
- Oct 11
- 1 min read
वृत्तसंस्था:-चाळीसगांव: अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या राज्याच्या २५३ तालुक्यांच्या यादीत चाळीसगांव तालुक्याचे नाव सुरुवातीला समाविष्ट नव्हते. यामुळे येथील शेतकरी तीव्र संतप्त झाले होते. शेतकऱ्यांचा हा संताप लक्षात घेऊन, चाळीसगांव तालुक्याचा समावेश बाधित तालुक्यांच्या यादीत तातडीने करावा आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने १० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता लेखी निवेदनाद्वारे चाळीसगांव तालुक्याचे तहसीलदार प्रशांत पाटील यांच्याकडे करण्यात आली होती.
माजी आमदार राजीव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत हे मागणी निवेदन तहसीलदार प्रशांत पाटील यांना देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, उपाध्यक्ष किसनराव जोर्वेकर, प्रदेश संघटक शशिभाऊ साळुंखे, तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, चाळीसगांव पं.स.चे माजी सभापती ईश्वर ठाकरे, उपसभापती अभय सोनवणे, माजी नगरसेवक भाऊसाहेब पोळ, सामाजिक न्याय विभागाचे जळगांव जिल्हाध्यक्ष सुरेश पगारे, माजी जि.प. सदस्य शेनपडू निंबा पाटील यांच्यासह सचिन दुबे, प्रताप भोसले, सौरभ त्रिभुवन, चितेगांवचे माजी सरपंच अमोल भोसले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
बाधित तालुक्यांच्या सुधारित यादीत चाळीसगांवचा समावेश
दरम्यान, राज्य शासनाने उशिरा प्रसिध्द केलेल्या राज्यातील ३४७ बाधित तालुक्यांच्या सुधारित यादीत अखेरीस चाळीसगांव तालुक्याचा समावेश करण्यात आला आहे. शासनाने यापूर्वी २५३ तालुक्यांची यादी प्रसिध्द केल्यानंतर, या यादीत ९४ तालुक्यांचा नव्याने समावेश केला आहे आणि त्यात चाळीसगांव तालुक्याचे नाव समाविष्ट आहे.राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या मागणीमुळे आणि शेतकऱ्यांच्या वाढत्या दबावामुळे राज्य सरकारने या यादीत सुधारणा केल्याचे स्पष्ट होते. चाळीसगांव तालुक्याचा समावेश बाधित तालुक्यांच्या यादीत झाल्याने येथील शेतकऱ्यांना आता सरकारी मदतीचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.







Comments