top of page
Search

नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यातील दोन उपनिरीक्षकांसह उपहारगृह चालक दोन लाखांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

  • Writer: gramasthlive
    gramasthlive
  • Jan 11
  • 1 min read



नाशिक येथील मुंबई नाका पोलीस ठाण्यातील दोन पोलीस उपनिरीक्षक आणि एका खाजगी उपहारगृह चालकाला दोन लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईमुळे पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील सविस्तर माहिती अशी की, तक्रारदार केतन भास्करराव पवार यांच्यावर मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ३२५/२०२५ अन्वेय गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी मदत करणे आणि तपासात सहकार्य करण्यासाठी तपास अधिकारी असलेल्या पोलीस उपनिरीक्षकांनी लाचेची मागणी केली होती. १० जानेवारी २०२६ रोजी रात्री ११:१५ वाजेच्या सुमारास हा सापळा रचण्यात आला होता. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय एकनाथ गोडे (रा. फ्लॅट क्र. १४, शकुंतला हाईट्स, लक्ष्मीनगर, नाशिक), पोलीस उपनिरीक्षक अतुल भुजंगराव क्षीरसागर (रा. रूम क्र. ४४, शासकीय विश्रामगृह, सिंहगड बिल्डिंग, नाशिक), उपहारगृह चालक रमेश गंभीरराव अहिरे (वय ६१) आणि कल्पेश रमेश अहिरे (वय २८) अशी आहेत. तक्रारदार यांच्याकडून दोन लाख रुपयांची लाच स्वीकारताना खाजगी पंटर कल्पेश अहिरे याला पकडण्यात आले, तर लाचेसाठी प्रोत्साहन दिल्याबद्दल दोन्ही पोलीस उपनिरीक्षकांना अटक करण्यात आली आहे. नाशिक एसीबीचे पोलीस उपअधीक्षक एकनाथ पाटील, हवालदार योगेश साळवे, हवालदार दिनेश खैरनार यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली आहे.

ग्रामस्थ लाईव्ह संपादक किसनराव जोर्वेकर बातमीसाठी संपर्क बबलु आहिरे चाळीसगाव

 
 
 

Comments


bottom of page