तरवाडे येथे खळबळ: पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या धनश्री शिंदेचा मृतदेह विहिरीत आढळला; घातपाताची शक्यता
- gramasthlive
- 5 days ago
- 2 min read
चाळीसगाव (प्रतिनिधी): चाळीसगाव तालुक्यातील तरवाडे येथील एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली असून गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या धनश्री उमेश शिंदे या अल्पवयीन मुलीचा मृतदेह आज मंगळवार, दिनांक १६ डिसेंबर रोजी सकाळी गावाजवळील जंगलातील एका विहिरीत आढळून आल्याने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे तरवाडे गावासह संपूर्ण पंचक्रोशीत शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, धनश्री ही गेल्या शुक्रवारी म्हणजेच १२ डिसेंबर रोजी नेहमीप्रमाणे आपल्या शाळेत गेली होती, मात्र शाळा सुटल्यानंतर ती सायंकाळी उशिरापर्यंत घरी परतलीच नाही. आपली मुलगी घरी न आल्याने काळजीत पडलेल्या कुटुंबीयांनी आणि ग्रामस्थांनी तिची सर्वत्र शोधाशोध केली, नातेवाईकांकडे चौकशी केली, मात्र तिचा कोठेही पत्ता लागला नव्हता. या गंभीर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर पोलीस यंत्रणेमार्फतही मोठ्या प्रमाणावर शोधकार्य राबवले जात होते. विशेष म्हणजे, ज्या परिसरात धनश्रीचा मृतदेह सापडला, त्याच परिसरात पोलिसांचे शोधपथक आणि ग्रामस्थ गेल्या पाच दिवसांपासून सातत्याने रात्रंदिवस पाहणी करत होते, मात्र आज सकाळी अचानक जंगलातील एका विहिरीत तिचा मृतदेह तरंगताना आढळून आल्याने या शोधकार्याचा अंत अत्यंत दुर्दैवी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी विजयकुमार ठाकूरवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील, एलसीबीचे राहुल गायकवाड तसेच चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस प्रशासनाने ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह विहिरीबाहेर काढला आणि घटनास्थळाचा रितसर पंचनामा केला आहे. ही घटना नेमकी कशी घडली, धनश्रीचा मृत्यू कशामुळे झाला आणि यामागे घातपाताचा काही कट आहे का, या दृष्टीने आता पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून संशयाची सुई घातपाताकडे वळली आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला असून त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे नेमके आणि अधिकृत कारण स्पष्ट होईल. सध्या पोलीस सर्व शक्यता पडताळून पाहत असून तपास अत्यंत सखोल पद्धतीने सुरू आहे. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये मोठा संताप आणि भीतीचे वातावरण असून प्रशासनाकडून सर्वांनी संयम बाळगावा आणि तपासात पोलिसांना पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस प्रशासन करत आहे.
ग्रामस्थ लाईव्ह
संपादक: किसनराव जोर्वेकर
बातमीसाठी संपर्क: बबलु आहिरे, चाळीसगाव









Comments