top of page
Search

चाळीसगावात भररस्त्यात अश्लील हावभाव; ४ महिलांविरुद्ध गुन्हा दाखल, पोलीस कारवाईतही आणला अडथळा

  • Writer: gramasthlive
    gramasthlive
  • Nov 15, 2025
  • 1 min read

चाळीसगाव शहरात येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना पाहून अश्लील हावभाव आणि इशारे करणाऱ्या काही महिलांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकाच्याच कामात अडथळा आणल्याची धक्कादायक घटना आज (दि. १५) घडली. याप्रकरणी, चाळीसगाव शहर पोलिसांनी ४ महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, चाळीसगाव शहरात काही महिला नागरिकांकडे पाहून अश्लील हावभाव करत असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक श्री. अमितकुमार मनेळ यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे, त्यांनी तातडीने गुन्हे शोध पथकातील महिला पोलीस कर्मचाऱ्यांना (ज्यात पोहेकॉ सुरवाडे, पोना बच्छाव, पोकॉ सबा शेख यांचा समावेश होता) कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले.मात्र, जेव्हा हे पोलीस पथक संबंधित ठिकाणी कारवाईसाठी पोहोचले, तेव्हा त्या महिलांनी पोलिसांना विरोध करत त्यांच्या शासकीय कामात अडथळा निर्माण केला.

यानंतर, पोलिसांनी या चारही महिलांना अधिक चौकशीसाठी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन येथे आणले. याप्रकरणी, श्री. सलीम अ. हकीम (वय ३०, रा. चाळीसगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, या महिलांविरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक ४९५/२०२५ अन्वये 'भारतीय न्याय संहिता २०२३' च्या कलम २९६(३)(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ स्वतः करत आहेत.ही कारवाई जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा. डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक (चाळीसगाव परिमंडळ) मा. श्रीमती कविता नेरकर-पवार, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी मा. विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव शहर पोलिसांनी केली आहे.

 
 
 

Comments


bottom of page