चाळीसगाव रेल्वे स्टेशन परिसरात गोळीबार; जुन्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला, आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
- gramasthlive
- 46 minutes ago
- 2 min read
चाळीसगाव शहरात रेल्वे स्टेशन परिसरातील भींतीजवळ जुन्या भांडणाची कुरापत काढून एका तरुणावर गावठी कट्ट्याने गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली असून याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी रोहिदास राजू कोळी (वय ३०, धंदा मजुरी, रा. हिरापूर रोड, चाळीसगाव) हे दिनांक १८/१२/२०२५ रोजी रात्री ११:३० वाजेच्या सुमारास त्यांचे मित्र चेतन शामकांत गोल्हार, दुर्गेश संजय मोरे आणि सोनू संजय करडक यांच्यासह रेल्वे स्टेशन लगत असलेल्या भींतीजवळ मोकळ्या जागेत सिगारेट पीत थांबलेले असताना, रात्री ११:४५ वाजेच्या सुमारास आरोपी दीपक सुभाष मरसाळे व त्याच्यासोबत असलेला एक इसम त्या ठिकाणी आले. यावेळी आरोपी दीपक मरसाळे याने मागील भांडणाचा राग मनात धरून फिर्यादी रोहिदास कोळी यांना शिवीगाळ करत 'आज तुला संपवतो' अशी धमकी दिली आणि आपल्या जवळील बनावटी गावठी पिस्तुल (कट्टा) काढून रोहिदास यांच्यावर जीवघेणा गोळीबार केला. गोळीबार होताच रोहिदास कोळी हे आपला जीव वाचवण्यासाठी रेल्वे स्टेशनच्या भिंतीकडून पळत असताना, आरोपीने झाडलेली गोळी त्यांच्या उजव्या पायाच्या मांडीवर लागली. गोळीबाराच्या आवाजामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आणि फिर्यादीचे मित्रही तिथून पळून गेले. जखमी अवस्थेत रोहिदास कोळी यांनी प्लॅटफॉर्मच्या बाजूला लपून आपला जीव वाचवला आणि रात्री छपत-लपत घर गाठले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्रासामुळे त्यांनी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन गाठून घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी त्यांना उपचारासाठी मेमो दिल्यानंतर, त्यांच्या आई आशाबाई राजू कोळी यांनी त्यांना ग्रामीण रुग्णालय चाळीसगाव येथे उपचारासाठी दाखल केले आहे. फिर्यादीने दिलेल्या जबाबावरून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला आरोपी दीपक सुभाष मरसाळे व त्याच्या साथीदाराविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०९, ३५२, ३५१(२), ३५१(३), ३(५) तसेच शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३, २५ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३) चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अमितकुमार मानेळ यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय योगेश माळी व पोहेकॉ/२४३ विनोद पाटील हे करीत आहेत.
ग्रामस्थ लाईव्ह संपादक किसनराव जोर्वेकर बातमीसाठी संपर्क बबलु आहिरे चाळीसगाव





