top of page
Search

गौताळा अभयारण्यात 'चंदनचोरी' पचवण्याचा प्रयत्न? PCCF च्या आदेशाला CCF कडून केराची टोपली; वनविभागात मोठी बंडाळी!

  • Writer: gramasthlive
    gramasthlive
  • 3 days ago
  • 1 min read




चाळीसगाव (प्रतिनिधी): जागतिक वारसा स्थळांच्या रांगेत असलेल्या आणि जैवविविधतेने नटलेल्या पाटणादेवी–गौताळा अभयारण्यातील मौल्यवान चंदन तस्करीचे प्रकरण आता वनविभागातील अंतर्गत यादवीचे कारण ठरत आहे. या प्रकरणात राज्याच्या वनविभागातील प्रशासकीय शिस्तीचे अक्षरशः धिंडवडे निघाले असून, राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (PCCF-वन्यजीव) यांच्या लेखी आदेशाचा मुख्य वनसंरक्षक (CCF-प्रादेशिक), छत्रपती संभाजीनगर यांनी उघडपणे अवमान केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. गौताळा अभयारण्यात मोठ्या प्रमाणावर चंदन तोड झाल्याचे पुराव्यानिशी समोर आल्यानंतर, विभागीय वन अधिकारी (DFO) आणि सहाय्यक वनसंरक्षक (ACF) यांनी यावर एक चौकशी अहवाल सादर केला होता. मात्र, हा अहवाल अत्यंत थातूरमातूर आणि वस्तुस्थिती लपवणारा असल्याचे ताशेरे ओढत PCCF (वन्यजीव) यांनी २० नोव्हेंबर २०२५ रोजी स्पष्ट आदेश दिले होते की, या प्रकरणाची सखोल चौकशी CCF (प्रादेशिक) यांनी करावी. आश्चर्य म्हणजे, महिना उलटूनही या आदेशावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. उलट, "हे माझ्या अधिकार कक्षेत येत नाही" असे सांगून CCF (प्रादेशिक) यांनी चक्क सर्वोच्च पदस्थ अधिकाऱ्याचा आदेशच नाकारला आहे. या संशयास्पद भूमिकेमुळे आता वनवर्तुळात चर्चा सुरू झाली आहे की, १८० हून अधिक छायाचित्रात्मक पुरावे असतानाही चौकशी का टाळली जात आहे? या प्रकरणात खालपासून वरपर्यंतच्या अधिकाऱ्यांचे आर्थिक हितसंबंध गुंतलेले आहेत का? असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. चंदन तस्करीच्या या गंभीर गुन्ह्यात सहभागी असलेल्यांना वाचवण्यासाठीच वरिष्ठ कार्यालयाची दिशाभूल केली जात असून, पुरावे नष्ट करण्याची संधी दिली जात असल्याचा आरोप होत आहे. जर राज्याच्या सर्वोच्च वन्यजीव अधिकाऱ्याच्या आदेशाला कनिष्ठ दर्जाचे अधिकारी जुमानत नसतील, तर हा थेट शासनाच्या अधिकाराला दिलेले आव्हान मानले जात आहे. या प्रकरणातील संशयास्पद मौन पाहता, आता या चौकशीची सूत्रे मंत्रालयातील मुख्य सतर्कता अधिकारी (CVO) यांच्याकडे सोपवावीत आणि आदेशाचा अवमान करणाऱ्या संबंधित CCF, DFO आणि ACF यांच्यावर तातडीने निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी वन्यजीव प्रेमींनी केली आहे.

ग्रामस्थ लाईव्ह संपादक किसनराव जोर्वेकर बातमीसाठी संपर्क बबलु आहिरे चाळीसगाव

 
 
 
bottom of page